बकूल घाटे यांचा सत्कार

0
16

ज्ञान व अनुभवाचा फायदा यशस्वीतेसाठी होतो- डॉ.विजय सूर्यवंशी
गोंदिया,दि.२ : प्रशासनात काम करतांना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे. विषयाचे सखोल ज्ञान आणि कामाचा दांडगा अनुभव असेल तर अधिकारी यशस्वी होतो. श्री.घाटे यांचेकडे हे गुण असल्यामुळे ते यशस्वी अधिकारी ठरले. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
१ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे यांचे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपायुक्त (नियोजन) म्हणून पदोन्नतीने स्थानांतरण झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सत्कारमुर्ती बकूल घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी श्री.ठाकरे, श्री.शिंदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भूत, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन अधिकारी हा चांगला असेल तर कामात यश मिळते. विविध यंत्रणांना दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च व्हावा यासाठी नियोजन अधिकाऱ्याची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. वेळोवेळी पाठपुरावा करुन तो निधी वेळेतच खर्च झाला पाहिजे. याकडे या अधिकाऱ्याचे लक्ष असले पाहिजे.
श्री.घाटे यांनी प्रत्येक जिल्हा नियोजन समितीची सभा आपले कौशल्य वापरुन व विषयांची योग्यप्रकारे मांडणी करुन यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्यालयात काही पदे रिक्त असतांना देखील त्यांनी चांगले काम केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा त्यांनी चांगल्याप्रकारे विनियोग केला आहे. मार्च २०१६ अखेर १०० टक्के डीपीडीसीचा निधी त्यांच्या माध्यमातून यंत्रणांनी खर्च केला आहे. श्री.घाटे यांनी त्यांच्या कार्यालयाचे प्रभावी नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देतांना श्री. घाटे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. विधानसभा निवडणूकीच्या काळात जिल्हाधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्यादेखील यशस्वीपणे पाड पाडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करतांना विविध यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी व निधी वेळेवर खर्च करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मोहिते म्हणाले की, कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करुन काम केले तर चांगल्याप्रकारे आपण यशस्वी होतो हे घाटे यांनी सिद्ध करुन दाखविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी श्री.घाटे यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून रुजू झालेले तेजबहादूर तिडके यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री.लोणकर, श्री.तिडके, श्रीमती भूत , श्री.बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन कार्यालय, सांख्यिकी कार्यालय, रोहयो कार्यालय, भूसंपादन कार्यालय, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.कडू यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले.