येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार- आदिवासी विकास मंत्री

0
9

नागपूरदि.5 : आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याकडे राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज केले.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची दर दोन महिन्यातून तर शिक्षकांची दर तीन महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. गावित यांनी दिली.

नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत हिंगणा तालुक्यातील कवडस येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतीगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन डॉ. गावित यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, नागपूर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावडे, कवडसे गावाच्या सरपंच उषा सावळे आदी मंचावर उपस्थित होते .

डॉ. गावित म्हणाले, आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आदिवासी विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींच्या वसतीगृहांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यानंतर आश्रमशाळांतील निवासी शिक्षकांसाठी उत्तम निवाससेवा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आसल्याचेही त्यांनी सांगितले.

आश्रमशाळांमध्ये शिस्त राखली जावी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीही योजना आखली आहे. यानुसार अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना शिकवलेल्या विषयांचे व्यवस्थित आकलन झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी दर दोन महिन्यांनी त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षकांनीही शिकवलेला विषय विद्यार्थ्यांना आकलन व्हावा यासाठी विविध पद्धतींचा  अवलंब करणे अपेक्षित आहे. म्हणून शिक्षकांचीही यासंदर्भात दर तीन महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे डॉ. गावित म्हणाले. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची आश्रमशाळेतील उपस्थिती नोंद घेण्यासाठी बायोमेट्रिक व फेसरीडिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आश्रम शाळेतील हुशार मुलांसाठी शाळेतच वेगळे वर्ग भरविण्यात येतील. तर  विद्यार्थ्यांना आकलनात कठीण ठरणाऱ्या विषयांसाठी व्हरच्युअल वर्ग घेण्यात येतील. क्रीडाक्षेत्रात गती असणाऱ्या विद्यार्थांसाठी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, क्रीडा साहित्य पुरविण्यात येईल व क्रीडांगण सुसज्ज करण्यात येतील असेही डॉ. गावित यांनी संगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे आणि नागपूर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधीक्षक दीपक हेडाऊ यांनी प्रास्ताविक केले तर आश्रमशाळेच्या प्राचार्य विजया खापर्डे यांनी आभार मानले.

आश्रमशाळेतील मुलींच्या वसतीगृह बांधकामासाठी 12 कोटी 33 लाख रुपयांचा खर्चाला मंजुरी मिळाली आहे. 2217.6 चौ.मी. क्षेत्रावर हे बांधकाम होणार आहे. एकूण तीन माळ्यांची ही इमारत असून संरक्षक भींत, क्राँक्रीट रस्ता, पिण्याचे पाणी आदी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. आश्रमशाळेची स्थापना 1974 मध्ये झाली. येथे इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत एकूण 304 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.