दारूविक्रेत्यांना शासकीय योजनांपासून ठेवणार वंचित 

0
24
– मौशीखांब येथील ९ विक्रेत्यांना नोटीस
गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांब येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती, महिला बचत गटांच्या पुढाकारातून गावात अवैध दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. सोबतच गावातील ९ दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून यापुढे अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास शासकीय कागदपत्रांपासून वंचित ठेवण्यासह ५ हजारांचा दंड देखील वसूल करण्याचा इशारा देण्यात आला.
 मौशीखांब गावात मागील अनेक वर्षापासून अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, दीड-दोन वर्षापासून काही मुजोर विक्रेत्यांनी दारू विक्रीला सुरुवात केली. त्यामुळे गावात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे मौशिखांब येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती, महिला बचत गटाने पुढाकार घेऊन ग्रामसभा आयोजित केली. या महिला ग्रामसभेत दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला. दारू बंदीसाठी संघटन तयार करण्यात आले. दारू विक्री केल्यास 5000 रुपये दंड व ग्रामपंचायतकडून मिळणारे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. तसेच पोलीस कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार 9 दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना दारू विक्रेत्यांना देण्यात आली.