शिक्षिकांच्या भूमिकेची चौकशी करणार : तीन सदस्यीय समिती गठित

0
5

गोंदिया : जिल्हा परिषदेद्वारे चालविण्यात येणार्‍या फुक्कीमेटा (आमगाव) शाळेतील शिक्षकाकडून झालेला लैंगिक छळाचा प्रकार गंभीर आहे. ज्या शाळेत तीन शिक्षिका व दोन शिक्षक कार्यरत आहेत, त्या शाळेत हे घडावे हे आश्‍चर्यकारक असून त्या तीनही शिक्षिकांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत झाली. त्यानुसार जि.प.च्या कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी वंदना शिंदे यांचे नेतृत्वात तीन सदस्य समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले. स्थायी समिती सभा १३एप्रिल २0१६ ला अध्यक्ष मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी. कटरे, देवराव वडगाये, छाया दसरे, विमल नागपुरे, सीईओ दिलीप गावडे यांचे शिवाय समिती सदस्य गंगाधर परशुरामकर सुरेश हर्षे, उषा शहारे, रमेश अंबुले, अल्तापभाई, रजनी कुंभरे व इतर सदस्य तथा सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. फुक्कीमेटा शाळेतील प्रकरणामुळे जि.प.ला शरमेने मान खाली घालावी लागली. ३ शिक्षिका असूनही या शाळेतील २ शिक्षिकांनी असे घृणास्पद कृत्य करावे हे संशयास्पद असून या शाळेची वरोरा येथे गेलेली सहल व जैतुरटोला येथील क्रीडा सत्रातील घडलेला प्रकार पाहता तेव्हा या शिक्षिका कुठे होत्या? असा प्रश्न परशुरामकर यांनी केला. महिला सदस्याची समिती स्थापन करुन या महिला शिक्षिकांच्या संशयास्पद वागणुकीची चौकशी करुन अहवाल सादर करावा अशी मागणी केली. तेव्हा अध्यक्ष उषा मेंढे यांनी सदर मागणी मान्य करुन कृषी विकास अधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी सांख्यीकी वैशाली खोब्रागडे आणि अर्जुनी मोरगाव येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती हवेली अशा तीन अधिकार्‍यांची समिती गठीत करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.