राखीव वनात बिबट्याची शिकार

0
7

तुमसर  : विद्युत शॉकने बिबट्याची शिकार केल्याची घटना १९ एप्रिलला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील राखीव वन कम्पार्टमेंट मध्ये घडली आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
तुमसर तालुक्यात वनालगत शेती पिकविणारे शेतकरी रानटी जनावरांचा हैदोस रोखण्याकरिता शेतात विद्युत प्रवाह सोडत असतात. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेतशिवाराकडे वळतात. या क्षेत्रात सकाळच्या सत्रात गस्तीवर असलेले आर.डी. कोदाने (वनरक्षक) व सहकार्‍यांना दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली असता बिबट मृतावस्थेत दिसला.
सदर बिबट हा दोन तीन दिवसांपूर्वी शेतालगत आला असताना त्यात याचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला.
बिबट्याचा मृत्यू झाल्याने आपण वन कायद्याच्या कचाट्यात अडकू, या भीतीने त्याचा मृतदेह साखळी येथील नाल्याजवळ आणून फेकला. बिबट्याचा मृत्यू दुषित पाण्यामुळे किंवा पाण्याअभावी झाला असावा, असे दर्शविण्याचा प्रयत्न शिकार करणार्‍यांनी केला. ही बाब नाकाडोंगरी वन विभागाला कळताच त्यांनी गोंदिया येथील वनविभागाच्या श्‍वान पथकाला पाचारण केले. मात्र त्यातही फारसे यश मिळाले नाही. आजुबाजूला कुठेही बिबट्याचे पदचिन्ह न आढळल्याने दुसरीकडून बिबट्याचा मृतदेह नाल्याजवळ आणून फेकल्याची खातरजमा झाली आहे