देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण व दुरूस्तीसाठी दहा कोटी

0
10

देसाईगंज : रेल्वे विभागाच्या वतीने देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण व दुरूस्तीसाठी दहा कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून नोव्हेंबर २०१५ पासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरूस्तीनंतर रेल्वे प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. सदर काम तत्काळ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातून केवळ १७.५ किमी एवढ्या अंतरातून रेल्वे जाते. देसाईगंज येथे एकमेव रेल्वे स्थानक आहे. रेल्वेस्थानकाला दर वर्षी कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होत असले तरी या रेल्वे स्थानकाच्या दुरूस्तीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत होता. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्याची मागणी होत होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दुरूस्तीचे काम नोव्हेंबर २०१५ पासून हाती घेण्यात आले आहे.

रेल्वे लाईनची दुरूस्ती, रेल्वे स्थानकातील नाल्यांवरील पुलांचे बांधकाम, रेल्वे फलाटाची उंची वाढविणे, रेल्वे स्थानकाच्या सभोवताल संरक्षण भिंती बांधणे, दोन फ्लायओवर पूल, गोदाम, यात्री शेड, शौचालय आदींचे बांधकाम व दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. हे सर्व बांधकाम झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.