राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – पालकमंत्री डॉ.दीपक सावंत

0
12

भंडारा : शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना असो की दुष्काळग्रस्त गावांमध्ये देण्यात येणाऱ्या सवलती अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. 

पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 56 वा वर्धापनानिमित्त पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन जनतेला संबोधित केले. यावेळी पोलीस पथक (महिला व पुरुष), गृहरक्षक दल, बँड पथक, पोलीस दामिनी पथक यांनी पथसंचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय आणि कृषि विभागांनी तयार केलेले चित्ररथ ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार ॲड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते. 

पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यात एकूण 15 हजार 747 दुष्काळग्रस्त गावे जाहिर झाली असून आपल्या जिल्ह्यातही 371 गावांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. यासर्व गावांना शासनाने 7 प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत. मामा तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला असून यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये या कामाकरिता 150 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्याला यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 
धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत दराव्यतिरिक्त 200 रुपये प्रतीक्विंटल प्रोत्साहनपर बोनस शासनाने दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 16 हजार 760 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. यावर्षी जिल्ह्यात 6 लाख 17 हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. त्यासाठी बोनस सहित 99 कोटी 33 लक्ष रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.

कृषीपंपांना अखंडीत वीजपुरवठा करणे महत्त्वाचे असून शेतीसाठी वेगळे फिडर बसविण्याची योजना राबविण्यात येत आहे. मार्च 2016 अखेर पर्यंत 2 हजार 700 कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यावर्षी 3 हजार 600 कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यात 605 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यावर्षी 772 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असून यासाठी 3 रोजगार मेळावे घेण्यात आले होते. त्याचबरोबर सैन्य भरती रॅलीत जिल्ह्यातील 48 उमेदवारांची सोल्जर जनरल ड्युटी या पदासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मनरेगा अंतर्गत 2 लाख 49 हजार मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. यासाठी मजुरांना 81 कोटी रुपये वेतन मिळाले आहे. 

स्वच्छ महाराष्ट अभियानांतर्गत हागणदारी मुक्तीसाठी जिल्ह्यातील 142 गावांचा समावेश करण्यात आला असून 103 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. 2016-17 मध्ये संपूर्ण भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर भंडारा आणि तूमसर नगरपरिषद स्वच्छ शहराच्या यादीत सामील झाले असून या दोन्ही नगर परिषद नगराध्यक्षांचे त्यांनी अभिनंदन केले. यावर्षी महाराष्ट्र शासनाने वन महोत्सव कालावधीत “हरित महाराष्ट्र” संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 2 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नागरिकांनी वृक्ष लागवड व संगोपन करुन यामध्ये सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भंडारा आणि तुमसर नगर परिषदेने हागणदारीमुक्त शहर केल्याबाबत नगराध्यक्ष बाबुराव बागडे व अभिषेक कारेमोरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागेल त्याला शेततळे अंतर्गत रामेश्वर इनवाते, उत्तम वरकडे, सुखदेव कोडवते या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यरंभ आदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गालफाडे आणि मुकुंद ठवकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.