सामूहिक प्रयत्नांमुळेच गडचिरोली जिल्हा विकासात अग्रेसर: अम्ब्रिशराव आत्राम

0
9

गडचिरोली-१:  सर्वांच्या प्रयत्नांमुळेच गडचिरोली जिल्हा आता विकासात अग्रेसर झाला आहे.  विकासात सर्वांचे सहकार्य कायम ठेवून ही वाटचाल पुढेही सुरु राहील याची खात्री आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

या सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जिल्हाधिकारी रणजित कुमार, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु गोयल, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 जिल्हयाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी गडचिरोली रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडले जावे यासाठी मोठया प्रमाणावर हालचाली आता सुरु झाल्या आहेत.  दुर्गम अशा या जिल्हयाला दळण-वळणाच्या साधनांनी जोडणे आवश्यक आहे.  या जाणीवेतूनच हे काम करण्यात येत आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे यासाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

महसूल विभागाने समन्वयातून जिल्हयात विकास कामांना गती देण्याचे प्रयत्न केले आहेत.  सोबतच महसूल वसूलीचे उद्दीष्ट १३० टक्के इतक्या विक्रमी पातळीवर नेले, याबद्दल जिल्हाधिकारी रणजित कुमार यांचे श्री.आत्राम यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यात आदिवासी माणूस विकासाच्या केंद्रस्थानी असून, आदिवासींच्या विकासासाठी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २२६ कोटी ८९ लाख रुपये तरतूद करण्यात आली होती. या रकमेपैकी ९९.९० टक्के इतका निधी खर्च करण्यात आला आहे. येणाऱ्या काळातही शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपवनसंरक्षक लक्ष्मी अण्णाबतुला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे,  कारागृह अधीक्षक रवीद्र ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले.