खासगी सोनोग्रॉफी सेंटर मालामाल

0
14

वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाखो रुपये खर्च करून शासनाने ‘सोनोलाजिस्ट’ ही सोनोग्रॉफी मशीन खरेदी केली. मात्र ही मशीन सतत बंद असते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील महिलांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाण्यासाठी सहीनिशी व ‘त्या’ दवाखान्याच्या चिठ्ठीवर नमूद करून पाठविले जाते. यातून शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांची मोठय़ा प्रमाणात लूट होत असून सोनोग्राफी सेंटरचे मालक मात्र मालामाल होत आहेत.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात राज्य शासनाने अनेक महागड्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयात तालुक्यातील गर्भवती महिला उपचारासाठी येतात. महिलांची सोनोग्राफी करणे अनिवार्य असते. परंतु रुग्णालयात सोनोलॉजिस्ट तज्ञ नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी त्यांना खासगी रुग्णालायतील सोनोग्राफी सेंटरला जा, असे सांगत त्या रूग्णालयाची चिठ्ठी लिहून देत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून ग्रामीण रूग्णांची मोठय़ा प्रमाणात लूट होत आहे.