चिचगाव रोहयो गैरव्यवहार प्रकरण : संतप्त मजुरांचा अभियंत्यांना घेराव

0
10

गोरेगाव (जि.गोंदिया), ता. १९ : तालुक्याच्या चिचगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाला. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरिता बुधवारी (ता. १८) पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता चिचगावात आले. परंतु, थातूरमातूर चौकशी करून विस्तार अधिकारी निघून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी कनिष्ठ अभियंत्यांना रोखून धरत घेराव घातला.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चिचगाव येथे पांदण रस्ता, शौचालय बांधकाम यासह इतरही कामांना सुरूवात करण्यात आली. दोन ते तीन महिन्यांपूर्वी हे काम हाती घेण्यात आले. या कामावर १५० मजूर कार्यरत होते. मध्यंतरीच्या कालावधीत रोजगारसेवक, सरपंच व उपसरपंच यांनी संगणमत करीत बोगस मस्टर तयार केला. जे मजूर कामावर आले नाहीत. त्यांची नावे मस्टरवर चढविली. कार्यरत मजुरांपैकी जवळपास ६० मजुरांकडून प्रत्येकी एक मजूर या प्रमाणे आठवड्याला १८० रुपये वसूल केले. अधिक मजुरी काढण्याच्या नावावर ही रक्कम रोजगारसेवक, सरपंच व उपसरपंचाने उखळली. एवढेच नव्हे तर, जाबकॉर्ड बनवून देण्याच्या नावावर २०० रुपये मजुरांकडून घेतले. याशिवाय शौचालय बांधकामासाठी ज्या लाभाथ्र्याने ५०० रुपये दिले, त्याचेच शौचालय बांधण्यात आले. ज्यांनी ही रक्कम दिली नाही, त्यांना डच्चू दाखविण्यात आला. दरम्यान, या गैरव्यवहाराची तक्रार चिचगावचे माजी सरपंच जितेंद्रकुमार कटरे यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाèयाकडे केली. या तक्रारीनुसार प्रकरणाच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी गिरेपुंजे व कंत्राटी कनिष्ठ अभियंता विजय रहांगडाले हे सकाळी ११.३० वाजता चिचगाव ग्रामपंचायतीत आले. परंतु, थातूरमातूर चौकशी करीत विस्तार अधिकारी निघून गेले. दरम्यान, बयान न नोंदविताच अधिकारी निघून जात असल्याने संतप्त झालेल्या मजुरांनी कनिष्ठ अभियंत्याचे वाहन रोखून धरत घेराव घातला. तब्बल एक तास त्यांनी अभियंत्यांना रोखून धरले. त्यानंतर कटरे यांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला.