महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध

0
28

नागपूर : राज्य महिला आयोग आता महिलांच्या गाऱ्हाणी व समस्या ऐकूण घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत येत असून यापूर्वी औरंगाबाद व कोल्हापूर येथे कार्यशाळा घेऊन आयोग त्यांच्यापर्यंत गेले होते. आता नागपूर येथे आठ जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. या दोन दिवसांत निश्चितच महिलांचे प्रश्न मार्गी लागतील. आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव होण्याच्या उद्देशाने जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. राज्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या महिलेलाही महिला आयोगाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी केले.

राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून नागपूर येथे महानगरपालिकेच्या महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करुन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी उद्घाटन केले. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती नीता ठाकरे, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व आठही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक तसेच सुमारे 300 महिला प्रतिनिधी या शिबिरात उपस्थित होत्या.

श्रीमती राहटकर म्हणाल्या की, तीन महिन्यापूर्वी आयोगाचा कार्यभार स्वीकारला. आयोगाकडे राज्यातील 5 लाख प्रकरणे प्रलंबित असून सुनावणीचे 1500 प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांच्या निपटारासाठी आयोगाच्या माध्यमातून राज्यात विभागीय कार्यशाळा व सुनावणी करणार आहे.

महिला आयोगाचा उद्देश राज्यातील दऱ्या खोऱ्यात पाड्या व तांड्यावर राहणाऱ्या वंचित महिलेला न्याय मिळावा हा असून तिला न्याय हक्कासाठी मुंबईला येणे शक्य होत नाही, त्यामुळे अशा कार्यशाळा व सुनावणींच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था, संरक्षण अधिकारी, एनजीओ व नगरसेवक यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांबाबत कायद्यात कठोर कारवाई करण्याची तरतूद असून कायद्याची अंमलबाजावणी जलद गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करावे, तसेच कायद्यासमोर महिला व पुरुष हे समान असून निकोप समाजाची निर्मिती होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

समाजातील व कार्यालयात काम करणाऱ्या महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय सहन न करता त्यासाठी पुढे यावे, व आपल्या परिसरातील नगरसेवक असेल किंवा एखाद्या स्वयंसेवी पदाधिकारी असेल त्याची मदत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल कराव्यात. पोलीस विभाग महिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आपल्या भाषणात महिला आयोगाने नागपुरात समुपदेशकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आयोगाचे अभिनंदन केले. अशाच कार्यशाळा सतत घेऊन समुपदेशकांना महिला संरक्षण विषयक कायद्याची माहिती देणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्था यात मोलाची कामगिरी बजावू शकतात. सामाजिक जाणीव जागृती करुन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन अनूप कुमार यांनी केले.


यावेळी महिला आयोगाच्या सदस्या निता ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला तक्रार निवारण केंद्र निर्माण झाले पाहिजेत व त्या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींचे निवारण केले गेले पाहिजे. यासाठी राज्य महिला आयोगामार्फत महिला आयोग आपल्या दारी ही कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेत नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला व अमरावती या ठिकाणाहून महिला मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. कार्यक्रमाचे आभार अपर्णा कोल्हे यांनी मानले.