३ जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
17

गडचिरोली-: सुमारे सहा लाखांचे बक्षीस असलेल्या एरिया अॅक्शन टीमच्या सदस्यासह एकूण १२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. उंगा उर्फ लच्छूराम पांडू वड्डे(२५), कुमली उर्फ शांती शंकर कवडो(२२) व बाली उर्फ कविता बुकलू पुंगाटी(१९) अशी आत्मसमर्पित नक्षलींची नावे आहेत.

उंगा उर्फ लच्छूराम पांडू वड्डे हा पेरमिली एरिया अॅक्शन टीमचा सदस्य म्हणून कार्यरत होता. २००८ मध्ये तो गट्टा दलममध्ये सहभागी झला. त्यानंतर तो पेरमिली दलममध्ये गेला. जोनावाही, तसेच इंद्रावती नदीवरील चकमक, पेरमिली बाजारातील भुसुरुंगस्फोट, मिरकल फाटा, बेजूरपल्ली, तोंदेल फाटा येथील भुसुरुंगस्फोट, बेजूरफाटा चकमक, एटापल्ली येथील कंत्राटदार खेडेकर यांचा खून, गोमणी येथील लाकडी बिटाची जाळपोळ इत्यादी घटनांमध्ये त्याचा सहभाग होता.

कुमली उर्फ शांती शंकर कवडो ही प्लाटून क्रमांक ७ ची सदस्य म्हणून कार्यरत होती. २०१३ मध्ये झालेल्या कुमलीने हिदूर येथील चकमकीत भाग घेतला होता. बाली उर्फ कविता बुकलू पुंगाटी ही भामरागड दलमची सदस्य होती. २०११ मध्ये ती दलममध्ये भरती झाली होती. कोसफुंडी, मुरंगल येथील चकमकी, भुसेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनी काळा झेंडा फडकावणे व शहीद सप्ताहाच्या बंददरम्यान भामरागड-लाहेरी परिसरात बॅनर व पोस्टर्स लावणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग होता. पोलिस विभाग आत्मसमर्पित नक्षल्यांना भूखंड, आर्थिक मदत तसेच रोजगार देत असल्याने यंदा नक्षल्यांच्या विभागीय समितीच्या सदस्यासह एक कमांडर व विविध दलमच्या २४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे.