प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन

0
13

गोंदिया, दि.16 : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सव चर्चासत्राच्या दालनात जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन तथा जिल्हास्तरीय कार्यशाळा 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारला मोदी मैदान, बालाघाट रोड टी पाईंट जवळ, गोंदिया येथे करण्यात आले.

        सदर कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी पीएमएफएमई (PMFME) धनराज तुमडाम, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद, हेमंत जगताप प्रशिक्षक कृषी कौशल्य परिषद पुणे, कृषी अधिकारी पवन मेश्राम तसेच प्रविण वानखेडे नागपूर युनिवर्सल एक्सपोर्ट, स्वस्तिक पारधी आयटीसी इंडिया कंपनी, दुर्गाप्रसाद ठाकरे दुर्गा केटर्स, कमलेश राहांगडाले सनदी लेखापाल तसेच सचिन कुंभार अर्थ सल्लागार स्मार्ट व विविध खरेदीदार उपस्थित होते.

        सर्वप्रथम जिल्ह्यातील योजनेअंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भांडवली उद्योग गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, मार्केटींग व बिजभांडवल या माध्यमातून व्यावसाईक हितसंबंध निर्माण करून सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनांना विक्रीसाठी नवीन संधी उपलब्ध होणे हा खरेदीदार विक्रेता संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याबाबत कृषि उपसंचालक धनराज तुमडाम यांनी सांगितले.

        सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी खरेदीदार विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून थेट खरेदीदारांशी चर्चा करून आपल्या उत्पादनाची माहिती देऊन विक्री करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले.

       प्रविण वानखेडे यांनी संमेलनामध्ये आयात निर्यात यासंदर्भात लाभार्थ्यांना माहिती दिली. माल निर्यात करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, परवाने व मानके याबाबतही सांगितले. सनदी लेखापाल सुभाष राहांगडाले यांनी अर्ज प्रक्रियेला लागणारी आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत माहिती दिली. भौदीप शहारे जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी पीएमएफएमई (PMFME) अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. सचिन कुंभार यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेबाबत विस्तृत माहिती सांगितली. त्यानंतर उपस्थित खरेदीदार व योजनेचे लाभार्थी यांची चर्चा घडवून आणण्यात आली व त्यांचे मौखिक करार करण्यात आले.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार कृषी अधिकारी गोंदिया पवन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहाय्यक लक्ष्मी डहाके व एफएलओ तथा तंत्र सहाय्यक पीएमएफएमई (PMFME) पायल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.