जि.प. उपाध्यक्षाची कार्यकारी अभियंत्याला मारहाण

0
11

वर्धा : जिल्हा परिषद बांधकाम सभापती व उपाध्यक्ष विलास कांबळे आणि कार्यकारी अभियंता प्रकाश कोहाळे यांच्यात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास झटापट झाली. घटनेच्या निषेधार्थ जि.प. कर्मचार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले. शहर ठाण्यात कांबळेंविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त महितीनुसार, सभापती विलास कांबळे सकाळी १0 वाजता आपल्या कक्षात दाखल झाले. १0.३0 वाजता त्यांनी विभागाशी संबधित कामानिमित्त विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश कोहाळे यांना आपल्या कक्षात बोलावले. तब्बल दोन तास झाल्यानंतरही ते आले नाही. असाच प्रकार यापूर्वीही अनेकदा घडल्याची माहिती आहे. आपल्याच विभागाचा अधिकारी सभापतीच्या बोलविण्याला दाद देत नसल्याची बाब विलास कांबळे यांना खटकली. यानंतर कांबळे स्वत:च कार्यकारी अभियंता कोहाळे यांच्या कक्षात जायला लागले.वाटेतच वर्‍हांड्यात कोहाळे यांची त्यांच्याशी गाठ पडली. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. दरम्यान, कोहाळे यांना बांधकाम सभापतींनी मारहाण केल्याची वार्ता जिल्हा परिषदेत पसरली. कोहळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना माहिती दिली. सायंकाळी पोलिसात तक्रार केल्यावर रात्री उशिरा कांबळेविरूद् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.