ड्रोन वॉच :वाळू तस्करीला बसणार आळा

0
8

* विकास कामांची होणार पाहणी

गोंदिया दि.15 :- जिल्हयातील रेतीघाटावरुन होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी आणि विकास कामांची हवाई पाहणी करण्यासाठी ड्रोन हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. जिल्हयात वैनगंगा, वाघ, चुलबंद, आणि शशीकिरण नदीतील रेतीघाटाचा दरवर्षी ई-लिलाव करुन रेतीची विक्री केली जाते. या रेती विक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. परंतू या रेतीघाटावरुन दिवसा आणि रात्रीला मोठ्या प्रमाणात वाळूची चोरट्यामार्गाने तस्करी (चोरी) होते. परिणामी शासनाचा महसूल बुडतो. यावर उपाय म्हणून आता जिल्हयातील रेतीघाटांवर ड्रोनद्वारे हवाई टेहळणी करण्यात येणार आहे. या टेहळणीत होत असलेल्या रेती चोरीचे फोटो काढण्यात येणार असून याचे चित्रीकरण सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्या ट्रॅक्टरमधून रेती चोरी होत आहे तो ट्रॅक्टर व चोरी करणारे व्यक्ती स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे रेती चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास ड्रोन हे हवाई उपकरण सहाय्यभूत ठरणार आहे.
जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या विविध योजनांची ड्रोनद्वारे हवाई पाहणी करण्यात येणार आहे. यामधून योजनांची प्रगती, गुणवत्ता हे सुध्दा बघावयास मिळणार आहे. विशेषता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियानासह अन्य कामांची फोटो व चित्रीकरण उपलब्ध होणार असून वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदयांना बसलेल्या ठिकाणीच विकास कामाची प्रगती व गुणवत्ता दिसून येण्यास मदत होणार.
पालकमंत्री राजकुमार बडोले हे 13 जून रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे विविध विकास कामे कशाप्रकारे दिसू शकतात याचे प्रात्यक्षिक बघितले हे उपकरण विविध विकास कामांची प्रगती व मोजमाप करण्यासाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, सडक/अर्जुनी, सालेकसा, अर्जुनी/मोरगांव, गोरेगांव येथील पंचायत समितीचे सभापती, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.