महाबिजने पुरविले निकृष्ठ बियाणे;भाजपच्या प.स.सभापतीनी दिली तक्रार

0
13

index1गोंदिया- जिल्ह्यातील शेतकर्याना अनुदानावर धान बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले.त्यानुसार महाबीज या शासकीय कंपनीच्यावतीने पंचायत समितीस्तरावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले. अनुदानावर 68 क्विंटल धान बियाणे महाबीजच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मागविले होते.त्याच बियाण्यामध्ये पाखळ, कचरा,आणि कोंड्यासह निकृष्ठ धान बियाणे पॅकेटबंद करुन पुरविण्यात आल्याचे प्रकार सालेकसा व गोरेगाव पंचायत समितीमध्ये आढळून आले.अनुदानावर जरी फक्त 68 क्विंटल धान असले तरी बाजारातील कृषी केंद्रावर महाबीजचा सुमारे 16 हजार क्विंटल धानबियाणे उपलब्ध आहे.शासनाच्या पंचायत समित्यामध्येच जर महाबिजचे बियाणे निकृष्ठ प्रतिचे आढळून आले असतील तर कृषी केंद्रावरील कसे असतील असा प्रश्न उपस्थित करीत सालेकसा पंचायत समितीचे सभापती हिरालाल फाफनवाडे आणि गोरेगाव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी यांनी उपस्थित केला आहे.या दोन्ही भारतीय जनता पक्षाच्या सभापती महोदयांनी आज शनिवारला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांची भेट घेऊन महाबीजने पुरवठा केलेले निकृष्ट बियाण्यांचे बॅगच त्यांना निवेदनासोबत दिले.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती छाया दसरे या भारतीय जनता पक्षाच्या आहेत.त्यांच्या विभागाकडून महाबीजला पुरवठा आदेश देण्यात आला.त्याची सहनिशा पुरवठा आदी करण्यात आली नसावी असेच या प्रकरणावरुन समोर आली आहे.त्यातही निकृष्ठ बियाणांचा पुरवठाही भाजपच्या हातात असलेल्या सालेकसा व गोरेगाव पंचायत समितीलाच पुरवठा झाल्या्ने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या निकृष्ट बियाणांना त्वरीत परत घेण्यासंबधी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी कृषी विभागाला निर्देश दिले तसेच शेतकर्याना कुठल्याही परिस्थिती निकृष्ठ बियाणे पुरविले जाणार नाही याची खबरदारी घेण्याची सुचना देत कारवाईचे आश्वासन दोन्ही सभापतींना दिले.यासंदर्भात जि.प.कृषी विकास अधिकारी कु.वंदना शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवर माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.दरम्यान कृषी अधिकारी निमजे यांना संपर्क साधले असता त्यांना महाबीजच्यावतीने अनुदानावर पुरवठा करण्यात आलेला 68 क्विंटल बियाणे परत घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.