कोलपल्लीच्या चकमकीत ३ नक्षल्यांचा खात्मा

0
10

गडचिरोली,ता.१९: तेलंगणा व गडचिरोलीच्या ग्रेहाऊंड्स आणि सी-६० पथकानी संयुक्तरित्या आज पहाटे केलेल्या कारवाईत ३ नक्षलवादी ठार झाले. अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलपल्ली जंगलात ही घटना घडली.
कोलपल्ली परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेलंगणा सरकार व गडचिरोली पोलिसांनी त्या परिसरात नक्षलशोध अभियान राबविण्यास सुरुवात केली होती. आज पहाटे पोलिस व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली. त्यात ३ नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांसह एक एके ४७, एक एसएलआर एक ३०३ रायफल ताब्यात घेतली आहे. या चकमकीत ठार झालेले नक्षलवादी कमांडर दर्जाचे असावेत, असे त्यांच्याकडे आढळलेल्या शस्त्रांवरुन दिसून येते. शिवाय आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे. डॉ.अभिनव देशमुख यांनी पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे. दुपारी १ वाजता तिन्ही नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली येथे आणण्यात आले. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या मदतीने त्यांची ओळख पटविण्यात आली. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेला मंगी डिव्हीजनल कमिटीचा सदस्य चार्लेस उर्फ अथराम शोभन(३१)रा.रोमपल्ली जि. आदिलाबाद, ६ लाखांचे बक्षीस असलेला इंदरवेली एरिया कमिटी सदस्य व स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्याचा अंगरक्षक असलेला मुकेश(२५)रा.छत्तीसगड व ६ लाखांचे बक्षीस असलेला मंगी एरिया कमिटी सदस्य दिनेश(३१)रा.छत्तीसगड यांचा समावेश आहे. या तिघांचा महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या चकमकी, हत्या, जाळपोळ व अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एक डिव्हिजनल कमिटी सदस्य व दोन एरिया कमिटी सदस्य ठार झाल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.