कुटूंबाच्या उत्पन्न वाढीत बचतगटातील महिलांचा महत्वपूर्ण सहभाग – डॉ. विजय सूर्यवंशी

0
15

सालेकसात ६ वी सर्वसाधारण सभा
गोंदिया दि.२२ :- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायाला सुरुवात केली आहे. बचतगटातील महिलांचा कुटूंबाच्या उत्पन्न वाढीत महत्वपूर्ण सहभाग आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
सालेकसा येथील श्री. गडमाता संस्थानच्या सभागृहात २१ जुलै रोजी तेजस्विनी राज्य ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसाची ६ वा वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
सभेला जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोटांगले, बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता केंद्राचे समन्वयक श्री. पहिरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुंबई येथील प्रकल्प समन्वयक संजय गुप्ता, मंडळ कृषी अधिकारी श्री. मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सूर्यंवंशी बोलतांना म्हणाले, एकीकडे उद्योग व्यवसायासाठी घेतलेले कर्ज उद्योजक थकवितात परंतू बचतगटाच्या महिला घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच व नियमित करतात. कुटूंबातील शिक्षण, लग्न, आजारपण अशावेळी बचतगटातील पैसाच महिलांच्या उपयोगात येतो. सालेकसासारख्या मागास, दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यात माविमच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी बकरीपालनाचे काम चांगल्याप्रकारे केले आहे. बचतगटातील महिला बकरीवर उपचारसुध्दा करतात. त्यासाठी काही महिला पशुसखी म्हणून काम करीत आहे. ह्या पशुसखी महिला आता राज्यातील प्रगत जिल्हयात बकरीपालनाचे प्रशिक्षण देण्यासाठी जात आहे. ही अभिमानाची बाब आहे.
श्री खडसे म्हणाले, मानवाच्या प्रगतीचे मोजमाप हे मानव विकास निर्देशांकावरुन काढण्यात येते. महिला बचतगटाच्या माध्यमातून करण्यात येणारे उद्योग व्यवसाय हे प्रगतीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. ग्रामीण भागातील महिला ह्या बचतगटाच्या माध्यमातून सक्षम होत आहे. महिलांनी आता जलयुक्त शिवार अभियान, स्त्रीभृण हत्या रोखणे, वृक्ष लागवड कार्यक्रम, अंधश्रध्दा निर्मुलन यासारख्या विषयाकडे लक्ष देऊन समाजाच्या विकासाला हातभार लावावा. असे आवाहनही केले.
प्रास्ताविकातून श्री सोसे यांनी सालेकसा तालुक्यातील ८६ गावे व टोल्यामध्ये माविम काम करीत असल्याचे सांगून या तालुक्यात १,१५८ महिला बचतगट असून १४,२९७ महिला बचतगटांच्या सदस्य आहेत. तालुक्यातील ८४ ग्रामसंस्थांच्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना मिळत आहे. जिल्हयातील बचतगटांना विविध उपक्रम व त्यांच्या सुक्ष्म उपजिविका वाढविण्यासाठी १९ कोटी रुपये कर्ज स्वरुपात बँकाकडून वितरीत करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी निंबा येथील पशुसखी ललीता वडगाये व कारुटोला येथील सावित्रीबाई फुले बचतगटाच्या सचिव गीता गोंडाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सालेकसा तालुक्यातील बचतगटांच्या समुदाय साधनव्यक्ती, पशूसखी, मत्स्यसखी, कृषीसखी व ग्रामसंस्थेच्या पदाधिकारी तसेच बचतगटातील महिलांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, वर्षा साखरे, ज्योती शहारे, हंसराज रहांगडाले, प्रशांत बारेवार यांनी परिश्रम घेतले. संचालन शालू साखरे यांनी केले. उपस्थितांचे आभार उषा पटले यांनी मानले.