जि.प. सीईओविरूद्ध अविश्वासाच्या हालचाली

0
8

भंडारा : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात मंगळवारला बैठक दुपारी बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा परिषदेंतर्गत मे महिन्यात बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी या प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु या बदली प्रक्रियेत अनियमितता दिसून आली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. आता या शिक्षकांना बदली स्थगितीचे पत्र देण्याची गरज असताना कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्याबाबत पत्र दिले नाही. त्यामुळे या शिक्षकांचे वेतन कसे निघणार असा प्रश्न करून या सर्व प्रक्रियेला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर जबाबदार असल्याचा आरोप शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांनी केला आहे.

निंबाळकर यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्यासाठी काँग्रेसने त्यांचे नेते सेवक वाघाये, राष्ट्रवादीने प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्याशी केली. भाजपचे गटनेते अरविंद भालाधरे यांनीही वरिष्ठांची चर्चा केली आहे.

या बैठकीत अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती विनायक बुरडे, सभापती नीळकंठ टेकाम, सभापती शुभांगी रहागंडाले यांच्यासह भाजपचे गटनेते अरविंद भालाधरे व काही सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते.