एकोडीत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन;माजी पंचायत समिती सदस्याची विरूगिरी

0
18

; भ्रष्टाचाराची व्हावी चाैकशी
गोंदिया, ता. २४ ः तिरोडा तालुक्यातील एकोडी ग्रामपंचायतीअंतर्गत २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. संबंधितांकडे याबाबतची तक्रार करूनही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बुधवारी (ता. २४) सकाळी माजी पंचायत समिती सदस्य जे. पी. बिसेन यांनी एकोडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
एकोडी ग्रामपंचायतीअंतर्गत २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात १५ व्या वित्त आयोग, जनसुविधा, नागरी सुविधा, मनरेगाची कामे झाली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी तक्रार माजी पंचायत समिती सदस्य जे. पी. बिसेन यांनी जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती तिरोडा येथे मागील काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर अनेकदा याबतच्या तक्रारीही केल्या. इतकेच नव्हे, तर तोडगा न निघाल्यास पाण्याच्या टाकीवरून उडी घेण्याचा इशाराही दिला होता. या तक्रारीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २३ एप्रिलपर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने माजी पंचायत समिती सदस्य बिसेन यांनी बुधवारी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. जोपर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली होती.

आश्वासनानंतर उतरले खाली
घटनेचे गांभीर्य आेळखून संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंत्यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणाची चाैकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे माजी पंचायत समिती सदस्य बिसेन हे सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.