ताज बागसाठी करणार सोलर विजेचा वापर

0
8

नागपूर, दि. 24 – ताजबाग विकास आराखडा राबविताना ताजबागमधील संपूर्ण विजेची उपकरणे सोलरवर चालवा. तसेच सोलरचा उपयोग करून ताजबागसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना तयार करा. मनपाच्या पाणीपुरवठ्याशिवाय ताजबागची स्वत:ची जलस्रोत योजना असावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.संपूर्ण ताजबागमध्ये सोलर दिव्यांचा वापर करण्यासाठी सल्लागार नेमून आराखडा तयार करण्यात येईल. महाऊर्जा कंपनीला सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही पालकमंत्री म्हणाले.

ताजबाग विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामाचा आढावा आज रविभवन येथे पालकमंत्र्यांनी घेतला. या बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

ताजबागच्या एकूण 83 एकर जागेपैकी 30 एकर जागा वापरात आहे. विकासकामे करताना अतिक्रमण हटवून कामे केली जात आहेत. या संपूर्ण परिसराचा विकास केल्यानंतर लागणाऱ्या विजेची आवश्यकता सोलर विजेच्या माध्यमातून पूर्ण करा. संपूर्ण ताजबाग सोलरवर आणले तर मोठ्या प्रमाणात वीजबिलाची बचत होईल. तसेच येथे लागणाऱ्या पाण्यासाठी एक मोठे बोअर वेल तयार करून त्यासाठीही सोलर पंपाचा उपयोग करावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. यामुळे वीजबिल व पाणी बिलापोटी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.