गोरेगाव येथे समाधान शिबीर;लाभार्थ्यांना साहित्य व धनादेश वितरीत

0
10

गोरेगाव,दि.२५ :- सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी समाधान शिबीर उपयुक्त ठरत आहे. ग्रामीण भागातील जनतेचे प्रशासनाशी संबंधित असलेली विविध प्रकारची कामे या शिबीरातून होत आहे. शिबीराच्या माध्यमातून अनेकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज (ता.२५) गोरेगांव येथील शहिद जाम्या तिम्या हायस्कूलच्या प्रांगणात महाराजस्व अभियानातंर्गत आयोजित समाधान शिबीराचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. विजय रहांगडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर,उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, गोरेगाव नगराध्यक्ष सीम कटरे, उपाध्यक्ष आशिष बारेवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, मदन पटले, कुसन घासले, सीताबाई रहांगडाले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, पुष्पराज जनबंधू तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
आमदार रहांगडाले म्हणाले, राजस्व विभागाशी अनेकांचा संबंध येतो. या विभागाकडे कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तीचे काम झाले पाहिजे. शिबीराच्या माध्यमातून अनेकांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होत आहे. प्रत्येक तालुक्यात समाधान शिबीराचे आयोजन करुन जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हयात महिला दारुबंदीसाठी प्रयत्न करीत आहे. पोलीसांनी दारुबंदीसाठी महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सहकार्य करावे.असेही ते म्हणाले.
डॉ. भूजबळ म्हणाले, विविध स्टॉलच्या माध्यमातून योजनांची माहिती जाणून घेवून योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले जीवनमान उंचवावे. समाधान हे अंतिम उद्दिष्ट असेल तर पोलीस स्टेशनला कामानिमित्त येणारी व्यक्ती समाधानाने परत जाईल. पोलीसांकडून संवेदनशिल व जबाबदारीने काम करुन समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. रामगावकर यावेळी म्हणाले, जिल्हा हा ४८ टक्क्यांपेक्षा जास्त वनाने आच्छादीत आहे. त्यामुळे अनेकांचे अवलंबीत्व हे जंगलावर आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते. जिल्हयात वनालगतच्या गावातील १२००० कुटूंबाना एलपीजी गॅसचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वनयुक्त शिवार अभियान हा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. येत्या १ जुलै रोजी जिल्हयात ९ लक्ष ६० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री मोहिते म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला विविध योजनांची माहिती व्हावी व त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबीराच्या आयोजनातून आम्ही समाधनी आहोत हे सांगण्यासाठी जेव्हा नागरिक पूढे येतील तेव्हा हे शिबीर उपयुक्त ठरले असे समजता येईल. असे ते म्हणाले.
समाधान शिबीरात वनविभाग, समाजकल्याण, पशूसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण, भूमीअभिलेख, सुवर्ण जयंती राजस्व अभियान विदर्भ-कोकण ग्रामीण बँक, तालुका सेतू केंद्र, महावितरण यासह अठरा विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले. पालकमंत्र्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली.
यशस्वीतेसाठी तहसिलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसिलदार सर्वश्री एस. एम. नागपूरे, जी.आर. बेदी, जी.आर. नागपूरे, श्रीमती पारधीकर, समीर मिर्झा, श्री घासले, राहूल चोपकर, श्री लिल्हारे, श्री पराते, श्री भूषण उइके, श्री बघेले, श्रीमती शंभरकर, श्रीमती येळे, श्रीमती बोरकर, यांचेसह तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, यांनी केले. संचालन स्मिता आगासे यांनी तर उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी मानले.