प्रत्येक नागरिकांनी वृक्ष जगविण्याची जबाबदारी घ्यावी – खासदार नाना पटोले

0
9

भंडारा : पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी पुढाकार घेतला असून एकाच दिवशी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवड हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ठरणार आहे. केवळ शासनाने पुढाकार घेऊन चालणार नाही तर लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी 7 ते 10 वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे शासनाच्या वतीने आयोजित मुख्य वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अभिजीत चौधरी हे होते. आमदार ॲड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, उपवन संरक्षक एन. आर. प्रवीण आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुलात खासदार व आमदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे वृक्षारोपण करुन वनमहोत्सव साजरा केला. जिल्हाभरात एकाच दिवशी 8 लाख 34 हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यानिमित्ताने नागरिकांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करुन वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

जलयुक्त शिवार या योजनेप्रमाणे वनयुक्त शिवार राबवून जिल्हा हिरवागार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात केले. जास्तीत जास्त वृक्ष लावून संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकांनी घेतल्यास जिल्हा येत्या तीन वर्षात हिरवागार होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम वर्ष भर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.