जिल्हयातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाकडे वळावे- बडोले

0
5

कृषि दिन साजरा

गोंदिया दि.१ :- माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतीच्या विकासाचे स्वप्न बघितले होते. त्यांचे हे स्वप्न आता हळूहळू पूर्ण होतांना दिसत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी यांत्रिकीपध्दतीने शेती करुन आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता नगदी पिकाकडे वळावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जंयती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालक सचिव डॉ. पी.एस.मीना, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यंवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे, जि.प.च्या कृषि व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे यांची तर मंचावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण व देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी युवराज शहारे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कृषि दिनानिमित्त आयोजित कृषि सप्ताह हा केवळ भाषणापुरता मर्यादित राहून कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळागळातील शेतकऱ्यांपर्यत पोहोचवून त्यांना त्या योजनांचा लाभ द्यावा जिल्हयातील शेतकऱ्यांना आता भाजीपाला, उडीद, मुंग, यासह अन्य नगदी पिकाकडे वळण्यासाठी कृषि विभागाने प्रोत्साहित करावे. असेही त्यांनी सांगितले.
पालक सचिव डॉ. मीना म्हणाले, जिल्हयातील ७० टक्के पेक्षा जास्त लोक शेतीशी निगडीत आहेत. शेतकऱ्यांनी आता तांत्रिक शेती करुन जैविक खताचा वापर केला पाहिजे. दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता तेव्हा शेतकऱ्यांनी, कुकुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय यासारख्या जोडधंदे करावे. जिल्हयात मुबलक प्रमाणात पाणी असून शेतकऱ्यांनी फलोत्पादनाला महत्व द्यावे. शेतकऱ्यांनी बाहेर जिल्हयात व राज्यात अभ्यास दौरे करुन तशाप्रकारची शेती करावी. असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अश्विनी भोपळे यांनी मानले.