गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे अर्धामीटरने उघडले

0
10

भंडारा, दि.4: गेल्या चोवीस तासात काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, या धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
काल रात्री विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोसेखुर्द धरण्याच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी या धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ८६६ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. आष्टी व वडसाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीतील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असले, तरी हा पाण्याचा विसर्ग सर्वसाधारण असून, त्यामुळे पूर परिस्थितीची कुठलीही शक्यता नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गडचिरोली जिल्हयात गेल्या चोवीस तासांत चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल आरमोरी तालुक्यात पाऊस पडला. तेथे ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वांत कमी ८ मिलिमीटर पाऊस सिरोंचा तालुक्यात पडला.