प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत १ लाख बीपीएल कुटूंबाना मोफत गॅस

0
23

गोदिया,दि.15:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपन्न नागरिकांना गॅसवरील सबसीडी सोडण्याचे जाहिर आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला अनुसरून देशातील कोट्यवधी नागरीकांनी स्वेच्छेने गॅसवरील अनुदान सोडले व अनुदानाचे कोट्यावधी रूपये वाचले त्या पैशातून पंतप्रधानानी देशातील बीपीएल यादीमध्ये असणा-या कुटूंबाना मोफत गॅस उपलब्ध करून देणारी उज्जवला योजना तयार केली.त्यानुसार या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २०११ मध्ये करण्यात आलेल्या बीपीएल जनगणनेनुसार १ लाख २० हजार ६३० बीपीएल कुटुंबाना मोफत गॅस सिलेंडर व गॅस शेगडी पुरविण्यात येणार असल्याची माहिती खासदार नानाभाउ पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत गॅस वितरकांच्या सभेनंतर पत्रकार परीषदेत पत्रकारांना दिली. या योजनेसंदर्भात अधिक माहिती देतांना खासदार नाना पटोले यांनी माहिती दिली की, गॅस सिलेंडरसाठी लागणारा १६०० रूपये केंद्र सरकार अनुदान म्हणून देणार आहे.
तर गॅस शेगडीसाठी लागणारे १९० रूपये व प्रथम सिलेंडर भरल्यानंतर ते परत भरण्यासाठी लागणरे ६५० रूपये असे एकूण १६४० रूपये लाभार्थींना कर्ज म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम लाभार्थीकडून त्याला मिळणा-या गॅस सिलेंडर अनुदानातून जमा करण्यात येईल. लाभार्थीला या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी फक्त स्टॅम्पडयुटी म्हणून १०० रूपयेच भरावे लागणार आहेत. ज्या लोकांचे नाव बीपीएल यादीतून सुटले आहेत.
त्यांच्या नावाचीही यादी तयार केली जात आहे. व ज्या लोकांचे नाव बीपीएल यादीत आहेत त्यांना येत्या काही महिन्यातच नि:शुल्क गॅस मिळणार असून शक्य झाल्यास मोठ्या प्रमाणवर कार्यक्रमाचे आयोजन करून गॅस वितरण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याच वेळी त्यांनी गोंदिया जिल्हा सहकारी बँक, राष्टÑीयकृत बॅकाच्या मार्फत वितरीत करण्यात आलेल्या पीक कर्ज तसेच पंतप्रधान पीक विमा योजना तसेच खत व बोगस बियाणे संदर्भातील तक्रारीचाही आढावा घेतला. जिल्ह्यातील एकही शेतकरी पीक विमा कर्जापासून वंचित राहायला नको तसेच कर्ज घेणारे व कर्ज न घेणारे सर्व शेतकरी पंतप्रधान पीक योजनेच्या अंतर्गत सहभागी झाले पाहिजे.
तसेच बोगस बियाणे विकणा-या कंपन्या तसेच शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा अधिक किमतीने खत विकणा-या विक्रेत्या विरूध्द पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचे संबंधित अधिका-यांच्या निर्देश दिले. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा कृषी अधिक्षक चव्हाण,कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, लीड बँकचे व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा उपनिबंधक गोसावी, नाबार्ड चे व्यवस्थापक, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, रेखलाल टेंभरे, बंटी पंचबुध्दे, गुड्डू कारडा,अमित बुध्दे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.