संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी झाली तरच बहुजनांचा विकास-सुरेश माने

0
16

गोंदिया/भंडारा,दि.15 : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानातील तरतुदींची सत्ताधार्‍यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरच बहुजन समाजाचा विकास शक्य आहे. यासाठी बहुजन समाजातील समग्र बुद्धीवंत, विचारवंत, अभ्यासकांनी सम्यक विचार करून आपल्या संविधानदत्त अधिकार, हक्कासाठी लढा उभारून व्यवस्था परिवर्तन करावे, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा कायदे व संविधान तज्ज्ञ डॉ.सुरेश माने यांनी केले.
ते भंडारा व गोंदिया येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी,डाॅ.रमेश जनबंंधू,गोंदिया जिल्हाध्यक्ष प्यारेलाल जांभुळकर,संजय बोहरे,विदर्भवादी नेते छैलबिहारी अग्रवाल,सुधाकर शिवणकर,डी.एस.टेंभुर्णे,दिपम वासनिक, प्रा.दुधकुवर, गाडवे, मनोज गोस्वामी, शरद नागदेवे, AIMIM गोंदिया अध्यक्ष गुड्डू हुसैनी,अतुल सतदेवे,अॅड.श्रावण उके आदी उपस्थित होते. डॉ. माने म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या सम्यक विचारांचे अनुकरण करून ते आचरणात आणून कोणतीही वैचारिक तडजोड न करता अथक परिश्रम करून भारत देशाला सर्वसमावेशक असे संविधान अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही बहाल केली. त्यामुळे संविधानातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तरच या देशातील ओ.बी.सी., एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. या बहुजन समाजाचा विकास संभव आहे. याची जाणीव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना होती. त्यामुळे त्यांनी संविधानामध्ये सर्व समाज घटकांच्या विकासासाठी संविधानात्मक तरतुदी करून ठेवल्या असल्याने सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय हे प्रदान केले आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विना रक्तपाताशिवाय सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय क्रांती केली. त्यांच्या विद्वत्तेला व सम्यक विचार क्रांतीला जगात तोड नाही. हे जगाने मान्य केले आहे. संपूर्ण जगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली. त्यामुळे ते संपूर्ण जगाचे मार्गदाते आहेत.
ते म्हणाले, या देशातील साध्या, भोळ्या बहुजन समाजाच्या मतांवर सत्तेत आलेल्या सत्ताधार्‍यांनी बहुजन समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन प्रसंगी त्यांना वेठीस धरून बहुजन समाजाचे शोषण करणे सुरु केले आहे. त्यामुळे बहुजन समाजाचा विकास अधांतरी आहे. सत्तेत राहून सत्तेचा मनमानी उपभोग घेणे हाच सत्ताधार्‍यांचा उद्देश आहे. त्यांच्याकडून बहुजन समाजाचा विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या बहुजन समाजविरोधी कुटनीतीपासून बहुजन समाजाने वेळीच सावध होवून याविरोधात जुलमी सत्तेविरुद्ध लढा उभारला पाहिजे.