आरोग्य सेविकांचे सोमवारपासून उपोषण

0
10

गोंदिया,दि.24 : राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी गेल्या २५ नोव्हेंबर २0१५ ला परीक्षा घेण्यात आली. मात्र आठ महिने लोटले तरी ही या भरतीची पुढील प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परीक्षा देणार्‍या १0१३ उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यापैकी आठ उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
आरोग्य सेविकांच्या पदभरतीला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हान दिले होते. त्यानंतर न्यायालयाने राज्यभरात या पदभरतीला स्थगीतीे दिली होती. मात्र रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित होऊ नये म्हणून काही जिल्ह्यांनी ही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित निकालाच्या अधीन राहून उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. उमेदवारांनीही न्यायालयाचा निकाल मान्य राहील असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले.मात्र गोंदियातच ही प्रक्रिया का थांबविली. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराला घेऊन २५ जुलै पासून जि.प. समोर उपोषण करण्याचा इशारा सपना मेश्राम, पुष्पा कटरे, अनिता सोनवाने, लता कापसे, जयश्री केंद्रे, भूपाली उईके, वर्षा गेडाम व अर्चना बोरकर यांनी दिला आहे.