साकोली तालुक्यात नक्षलवादी सक्रीय ?

0
13

साकोली,दि.29-तालुक्यातील भिमलकसा प्रकल्प (वडेगाव) येथे सहा दिवसांपूर्वी नक्षलवादी येऊन रात्रीचे जेवण करून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस दलाने संपूर्ण जंगल परिसरात शोधमोहीम राबविली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी नक्षलप्रभावित गावातील पोलीस पाटलांना सतर्कतेचा इशारा देऊन हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. साकोली पोलीस ठाण्यातंर्गत ९३ गावांचा समावेश असून या ९३ पैकी २२ गावे ही नक्षलप्रभावित असून या गावात पोलिसांची नियमित गस्त ठेवण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे यांनी दिली आहे.यापुर्वी १९९४ ला नागझिरा दलम नावाने नक्षल्यांचा एक गट या भागात सक्रीय होता.परंतु गेल्या दीड दशकापासून काहीही नव्हते तरीही दोन तीन दिवसाच्या घटनेने पुन्हा नक्षली सक्रीय झाले की काय शंका निर्माण झाली आहे.
साकोली तालुक्यातील वडेगाव येथे भिमलकसा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा असल्याने हा तलाव गाव समिती व ग्रामपंचायतने मासेमारीकरिता पाच वर्षासाठी विलास केवट यांना लीजवर दिला आहे.या तलावातील मासे कुणी चोरून नेऊ नये, यासाठी केवट यांनी तलावाजवळ एक झोपडी बांधून रात्रीसाठी दोन जणांना देखरेखीसाठी ठेवतात. ते दोघेही या तलावाची देखरेख करतात.
सदर तलाव हे नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागून असून तलावाच्या चहूबाजूने घनदाट जंगल आहे. शनिवार २३ जुलैच्या रात्री तलावाजवळील झोपडीत मारोती मेश्राम (५0) व महादेव मेश्राम (५0) दोन्ही रा.खोडशिवणी रात्रपाळीत होते. मध्यरात्री ९ जण नक्षली गणवेशात आले. त्यात सहा पुरूष तर तीन महिलांचा समावेश होता. येथे आल्यानंतर त्यांनी जेवन मागितले व काही वेळानी निघून गेले. या घटनेची माहिती तीन ते चार दिवसानंतर बाहेर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र सदर इसम हे नक्षलवादी होते किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.