२00 ग्रामसेवकांचे पाच कोटी रूपये थकीत

0
15

भंडारा,दि.2 : शासकीय सेवेत १२ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांची अंशदायी पेन्शन योजनेची थकीत रक्कम जिल्हा परिषदकडून देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. जिल्ह्यातील २00 ग्रामसेवकांचे सुमारे पाच कोटी रूपये थकीत आहे. ती देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने ग्रामसेवकांनी सोमवारला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.आंदोलनात जयंत गडपायले, विवेक भरणे, एम. सी. खांडाळकर, एन. जी. सौदागर, एम. एस. शेंडे, रमेश झोडे, प्रभाकर रामटेके, यु. के. पाटे, अमित चुटे, मंगला डहारे, पी. आर. रामटेके, नरेश शिवणकर यांच्यासह अन्य ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले होते.
ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्रामसेवकांवरच जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय होत आहे. याचा निषेध करण्यासाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवने यांनी केले. जिल्ह्यातील सातही पंचायत समिती अंतर्गत सुमारे ३५0 ग्रामसेवक कार्यरत असून हे सर्व या आंदोलनात सहभागी झाले. जिल्हा परिषदने २00४ मध्ये कंत्राटी ग्रामसेवकांची पदभरती केली. त्यांचा तीन वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर त्यांना सेवेत नियमित करण्यात आले.
दरम्यान प्रत्येक ग्रामसेवकांच्या वेतनातून अंशदायी पेंशन योजनेच्या नावावर वेतनावर आधारीत काही रक्कम कपात केली. कपात झालेली रक्कमेवर शासन हिस्सा व त्यावर १0 टक्के व्याज अशी सुमारे अडीच ते तीन लाखांची रक्कम ग्रामसेवकांना मिळणे गरजेचे आहे.
ग्रामसेवक संघटनेने याबाबत अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाला विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सुमारे २00 ग्रामसेवकांना यातून पाच कोटींची रक्कम मिळणे आहे. ती अद्याप मिळालेली नाही किंवा त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही,त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.