चंद्रपूर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च 2017 अखेर पूर्ण करण्यात येईल-प्रवीण पोटे-पाटील

0
7

चंद्रपूर दि.3 : चंद्रपूर येथील जाम-चंद्रपूर-आसिफाबाद मार्गावरील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 93 वर उड्डाणपुलाचे काम मार्च 2017 अखेर पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.या संदर्भातील प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य ॲड. संजय धोटे, विजय वडेट्टीवार, जयदत्त क्षीरसागर, गणपतराव देशमुख यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता.

श्री. पोटे-पाटील म्हणाले की, चंद्रपूर येथून जाणाऱ्या जाम-चंद्रपूर-आसिफाबाद मार्गावर राजुरापासून 2 किलोमीटर अंतरावरील दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग 93 वर उड्डाणपुलाच्या
बांधकामाला सन 2008-09 मध्ये मंजुरी मिळाली होती. दिनांक 20 मार्च 2010 रोजी 17 कोटी रुपये रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या रेल्वे उड्डाण पुलाचे काम भारतीय रेल्वेमार्फत आणि जोडरस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. रेल्वेमार्फत हाती घेण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे काम करण्यास विलंब झाला असला तरी सदर
कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जोडरस्ते व त्यामधील व्हायाडक्टचे काम करणे शक्य झालेले नाही. या कामासाठी आतापर्यंत 18.69 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च झाली आहे. या पुलाची किंमत वाढली असून ती 24.53 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या कामास सुधारित मान्यता प्राप्त झाल्यावर व रेल्वेमार्फत पुलाचे काम पूर्ण झाल्यावर जोड रस्त्याची उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.