जिल्ह्यात कर्करोग सप्ताह ५१ रुग्णांची तपासणी

0
20

गोंदिया,दि.५ : केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्ह्यात २७ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग सप्ताह साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. कॅन्सर वॉरियर्स ग्रुपच्या मदतीने कोटपाच्या अंमलबजावणीसाठी आणि तंबाखूच्या दुष्परिणामाची चर्चा करण्यासाठी पोलीस विभागासोबत सभा आयोजित करण्यात आली होती. शिबिरातून जास्तीत जास्त रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टर्सकडून नाक, कान, घशाची तपासणी करण्यात आली. मौखिक कर्करोगासाठी जिल्ह्यात शिबिरे घेण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व शाळांमधून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. पोस्टर स्पर्धा सुध्दा आयोजित करण्यात आल्या. जिल्ह्यातील शिक्षक/विद्यार्थी यांना तंबाखूमुक्त शाळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कर्करोग सप्ताहाच्या निमित्ताने कर्करोगाबाबत समुपदेशन व प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातील सर्व रुग्णांकरीता केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे २ ऑगस्ट रोजी मौखिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये कर्करोग तज्ज्ञ डॉ.प्रमोद इंगोले, कॅन्सर वॉरियर्स ग्रुप्स यांनी ५१ रुग्णांची तपासणी करुन निदान केले.
ज्या रुग्णांना शस्त्रक्रीयेची गरज आहे त्या रुग्णांची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रीया केली जाणार आहे. कर्करोग सप्ताहाचा समारोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी डॉ.पातुरकर म्हणाले, तंबाखूमुळे मनुष्याच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरिराच्या प्रत्येक भागावर दुष्परिणाम होतो. प्रत्येकाला तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. स्वत:ची इच्छाशक्ती व समुपदेशनाच्या आधारे आपण तंबाखूच्या व्यसनापासून दूर कसे राहू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून दंत शल्यचिकित्सक डॉ.मनीष बत्रा यांनी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी सांगून सद्यस्थितीत तंबाखूमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला डॉ.राहूल उके, मेट्रन श्री.फुलझले यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार प्रकाश बोपचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दंत यांत्रिकी आरती कढव, दंत आरोग्यक फरहान उल्लाह खान, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता दिपक खाटे, डॉ.वंजारी, रुपाली आगडे, मयूर कांबळे, स्वाती वैद्य, कमलेश चाफले व पिंटू पारधी यांनी परिश्रम घेतले.