तरोणे,पाऊलझगडे व कुंभरे यांचे जि.प. सदस्यांचे अधिकार कायम

0
13

अर्जुनी मोरगाव दि. १२ : राज्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरविलेल्या तीन जिल्हा परिषद सदस्यांना अपिलाचा निकाल येईपर्यंत अभयदान मिळाले आहे. ६ ऑगस्ट रोजी नागपूर विभागाच्या उपायुक्तांनी आदेश निर्गमित करून त्यांचे अधिकार त्यांना देण्याचे निर्देश दिले.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, कमल पाऊलझगडे व नाजुक कुंभरे यांना निवडणुकीचा हिशेब विहित कालावधीत सादर न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरविले होते. संबंधित विभागाने तसे आदेश काढले. त्यामुळे या तीनही सदस्यांना गोंदिया जि.प.ने सभांमध्ये बोलावणे बंद केले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशाविरूद्ध तीनही सदस्यांनी तीन महिन्याच्या आत नागपूरच्या विभागीय आयुक्यांकडे अपिल केले. आयुक्तांनी ३जून रोजी त्यांचे अपिल स्वीकृतही केले.
वास्तविक जि.प. व पं.स. अधिनियम १९६९ च्या कलम १६ (२) (अ) अन्वये निर्ह ठरलेल्या व्यक्तींनी तीन महिन्याच्या आत अपिल दाखल केले व ते स्वीकृत करण्यात आले तर त्या अपिलाचा निकाल येईपर्यंत सदस्यांना जिल्हा परिषदेने सदस्य समजण्यात यावे असा निर्वाळा विभागीय आयुक्तांनी गुरुवारी (११) एका पत्राद्वारे दिला. यामुळे तीनही सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे नवेगावबांध परिसरात अपात्र सदस्यांच्या नावावर कोरी पट्टी लावून त्यांचे नाव खोडून काढले होते. जि.प. सदस्य हे शाळा समित्यांचे अध्यक्ष असतात. या समितीसुद्धा बदलविण्याच्या हालचालींना वेग आला होता.