वनक्षेत्रपाल रहांगडाले सुवर्णपदकाचे मानकरी

0
13

अर्जुनी-मोरगाव दि.१२-वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल सी.जी.रहांगडाले यांची वन व वन्यजीव व्यवस्थापनामध्ये भरीव कामगिरी केल्याबाबत सुवर्णपदकासाठी निवड करण्यात आली.राज्यभरातील वनकर्मचार्‍यांमधून सुवर्णपदकासाठी निवड झालेले ते एकमेव आहेत. त्यांच्याशिवाय इतर २१ कर्मचार्‍यांना रौप्य पदकांनी सन्मानित केले जाणार आहे.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वनसंरक्षणाचे काम प्रभावीपणे करीत असतात. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता, तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरीता राज्यस्तरावरून पुरस्कार, बक्षीस देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनरक्षक ते उपवनसंरक्षक या संवर्गातील कर्मचारी, अधिकारी यांना त्यांनी केलेले वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षण, शोधकार्य, वनव्यवस्थापन, नाविण्यपूर्ण शोध याबद्दल सुवर्ण व रौप्य पदकं देऊन गौरविण्यात येते. यावर्षी वनक्षेत्रपाल संवर्गातून सी.जी.रहांगडाले यांची निवड सुवर्णपदकासाठी करण्यात आली. रहांगडाले यांनी आपल्या कार्यकाळात लाखांदूर वनक्षेत्रात इंदोरा येथे ३0 हेक्टरमध्ये मिश्र रोपवन, मेळघाटमध्ये ३0 हेक्टरात मिश्र रोपवन, कोच्छी येथे मिश्ररोपवन तसेच पंढरपूर वनक्षेत्रात लेंडवे चिचाळ, अर्जुनी-मोरगाव येथील तिडका, धाबेटेकडी येथे मिश्र रोपवनाची निर्मिती केली आहे. गावोगावी वनसमित्या स्थापन करून लोकांच्या मनामध्ये जंगलाविषयी आवड निर्माण करण्याची त्यांची विलक्षण हातोटी आहे.त्यामुळे अवैध वृक्षतोडीवर आळा बसलेला आहे.