दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार उपयुक्त – पालकमंत्री डॉ. दीपक सावंत

0
7

भंडारा,दि.16 : जलयुक्त शिवार ही लोकांची चळवळ असून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरत आहे, लोकांसाठी पाणी व शेतीसाठी पाणी या उक्तीप्रमाणे जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे केले.

माटोरा येथे आयोजित जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. माटोरा येथे पालकमंत्री यांच्या हस्ते जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामामुळे साठलेल्या जलसाठ्याचे जलपूजन करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील पडोळे, तहसीलदार संजय पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माटोरा गावात 25 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 17 कामे पूर्ण करण्यात आली असून या कामांमुळे गावात एकूण 207 टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. सदर कामामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी गाव शिवारात अडविल्यामुळे गावाच्या पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मीटरनी वाढ झाली आहे. नवीन निर्माण झालेल्या पाणीसाठयामुळे साधारणत: 300 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच रब्बी हंगामात पिकाखालील क्षेत्रात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.