रुग्णांची आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करा – पालकमंत्री

0
8

सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिनचे लोकार्पण

भंडारा,दि.16 : रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी सुसंवाद साधून त्यांना प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देण्यात यावी. सिटीस्कॅन मशिनमुळे रुग्णांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाभ गरजु व्यक्तींना नियमित मिळावा, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सिटीस्कॅन मशिनचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री यांचेहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवीशेखर धकाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, शासनाने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन देण्याचा निर्णय केला असून त्यानुसार आज भंडारा येथील सिटीस्कॅन मशिनचे लोकार्पण होत आहे. राज्यात डॉक्टरांची संख्या कमी असली तरी शासनानी रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 केले आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी डॉक्टरांनी संवाद साधणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रऱ्येक रुग्णांची म्हणणे एकूण घेतल्यास अर्धा आजार तसाच बरा होतो, म्हणून संवाद साधणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

राज्याचे आरोग्य मंत्रीच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक चांगल्या होतील, असे मत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. सिटीस्कॅन मशिन शासनाच्या डावीकडवी विचारसरणीच्या निधीमधून बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही मशिन नियमित उपयोगात आणावी तसेच याचा लाभ सामान्य रुग्णांना मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.