मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पाविरोधात आविसंचा पुन्हा एल्गार

0
8

गडचिरोली,दि.२२: गोदावरी नदीवरील प्रस्तावित मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पासंदर्भात उद्या दोन्ही राज्य सरकारमध्ये करार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आदिवासी विद्यार्थी संघाने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देऊन प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला.
सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजवळच्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकार बॅरेज बनवीत आहे. या बॅरेजच्या विरोधात तेथील संघर्ष समितीने यात्रा काढली होती. तरीही तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता २ मे रोजी भूमिपूजन केले होते. त्यावेळीही काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार दीपक आत्राम यांनी स्वतंत्रपणे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून प्रखर विरोध केला होता. आता २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक होणार असून, दोन्ही सरकारमध्ये अंतिम करार होणार आहे. त्यामुळे या कराराचा निषेध म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दोन्ही सरकारकडून बाधित शेतकऱ्यांची सिरोंचा येथील तहसील कार्यालयात तत्काळ जनसुनावणी घ्यावी, अन्यथा आविसंतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दीपक आत्राम यांनी यावेळी दिला. याप्रसंगी आविसंचे सल्लागार रवी सल्लम, सडवली कुमरी, रवी बोंगोनी, श्याम बेझलवार, मारोती गणापुरपू, गादे सोमय्या, श्रीनिवास गंटा, बापू सडमेक, मदनय्या दुर्गम, विजय रेपालवार, चौधरी समय्या, अजय आत्राम,नारायण मुडीमाडीगेला, रामानंद मारगोनी, लक्ष्मण बोल्ले, मलय्या सोन्नारी, अशोक कावरे, कोठा व्यंकन्ना, सडवली जनगम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.