जि.प.अध्यक्ष मेंढे यांचे आवाहन :गृहभेटीतून शौचालयाची जागृती

0
15

गोंदिया,दि.23 : शौच ही नैसर्गिक क्रिया आहे. उघड्यावर शौच केल्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात. एका व्यक्तीच्या उघड्यावर शौचास जाण्यामुळे संपूर्णगावात आजार पसरू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शौचालयातच शौचास गेले पाहिजे. सुज्ञ व धनाढय़ लोक उघड्यावरच शौचास जातात, ही बाब चिंताजनक आहे.विष्ठेमुळे होणार्‍या आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गृहभेटीतून जनजागृती करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी (दि.२२) कुटूंबस्तर संवाद कार्यशाळेत त्या बोलत होत्या. २२ऑगस्ट ते २ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८लाख गृहभेटी अभियानांतर्गत कुटुंबस्तर संवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.
गोंदिया पंचायत समिती अंतर्गत पिंडकेपार ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख यांनी गृहभेटी करून शौचालय बांधकाम करणार्‍या लाभार्थ्याना पुष्पगुच्छ देवून त्यांचे कौतुक केले. भेटीदरम्यान शौचालय बनवून त्याचा वापर करणार्‍या कुटूंबियांच्या घरावर ‘लय भारी’ तर बांधकाम न करणार्‍या घरावर ‘खतरा/धोका’ हे स्टीकर लावण्यात आले.गृहभेटीत मेंढे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांना शौचालयाचे महत्व पटवून देत शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुकाअ जयवंत पाडवी, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती पी.जी.कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शर्मा उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. विष्ठेमुळे आजार होतात, हे गृहभेटीतून लोकांना समजावून सांगितले तर लोक शौचालय बांधण्यास तयार होतील. सध्या बांधकामाच्या कोणत्याच साहित्याचा तुटवडा नाही.त्यामुळे शौचालय बांधकामास गती यायला पाहिजे.डिसेंबर अखेर पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे यांनी केले. पाणी धावतो, त्यामुळे त्याला मार्ग सापडतो. आपण सुध्दा तशाच प्रकारे कार्यप्रवण असलो पाहिजे. गृहभेटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वच्छ भारत मिशनची योजना पोहचविण्याचे मत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती विमल नागपूरे यांनी केले. जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना तालुका वाटप करण्यात आला आहे. निधी आहे, लाभार्थीआहेत, प्रशिक्षीत गवंडी आहेत. आता केवळ नियोजनबध्द कार्यकेल्यास जिल्हा हागणदारीमुक्त करणे सोपे होईल, असे मत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम यांनी व्यक्त केले.आरोग्याकडे कुणीच लक्ष देत नाही. शौचालय हा आरोग्यासाठी आवश्यक आहे. शौचालयाचे बांधकाम व्हावे, यासाठीच कुटूंबस्तरावर संवादाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भेट दिल्यानंतर कुटूंबाला जिंकूनच येईन, असा सकारात्मक दृष्टीकोण असायला हवा, असे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख म्हणाले.