माजी खा.शिशुपाल पटलेंसह पाच जणांना शिक्षा

0
11

वर्धा,दि.27: भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिशुपाल पटले व त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना एक वर्षाचा सश्रम करावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एका महिना साध्या कारावासाचे प्रावधान आहे. हा निकाल येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी खुल्या न्यायालयात शुक्रवारी दिला.
भेसळयुक्त दूधाची विक्री केल्याप्रकरणी वर्धेतील मे. राजेंद्र दुधडेअरीचे राजेंद्र भुराजी अवथळे याला आरोपी करण्यात आले होते. तसेच सदर दूधाचे उत्पादक मे. पवन मिल्क अँन्ड फूड प्रोडक्टस, एस.आय.डी.सी. तुमसर रोड, ता. तुमसर, जि. भंडारा हे असल्यामुळे सदर पेढीचे सर्व मालक व भागीदार शिशुपाल नत्थूजी पटले, दूर्गाप्रसाद शंकरलाल पटले, सुमन दुर्गादास पटले, शिल्पा शिशुपाल पटले यांना भेसळयुक्त दुधाची उत्पादन व विक्रीप्रकरणी आरोपी करण्यात आले होते.याप्रकरणी साक्षीपुरावे नोंदविण्यात आले होते. आरोपी व शासनाच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. तत्कालीन अन्न निरीक्षक सं.भा. नारागुडे यांनी वर्धेतील मे. राजेंद्र दूध डेअरी या पेढीस अचानक भेट दिली. दरम्यान राजेंद्र भुराजी अवथळे याच्याकडून मे. पवन मिल्क अँन्ड फूड प्रोडक्टस, तुमसर रोड, भंडारा द्वारा उत्पादित ‘केशर गाय का दूध’ या अन्नपदार्थाचा नमुना 0२ ऑक्टोबर २00८ रोजी भेसळीच्या संशयावरून विश्लेषणाकरिता घेण्यात आला होता. सदर नमुना विश्लेषणाअंती कायद्याने ठरवून दिलेल्या गाईच्या दूधाच्या मानकापेक्षा कमी मानकाचे घोषित झाले. या आधारे प्रकरणाचा संपूर्ण तपास तत्कालीन अन्न निरीक्षकाने करून प्रकरण जानेवारी २00९ मध्ये येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट केले होते.