भाडीपार गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

0
4

सालेकसा : तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे भाडीपार गावासह संपूर्ण परिसरात एक दहशत पसरली आहे. तसेच या अज्ञात आजाराचा प्रकोप एवढ्या वेगाने वाढत चालला आहे. की आज गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना गोंंदियाच्या केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य चमू गावात दाखल झाली असून प्रत्येकाचे रक्त नमूने घेऊन औषधोपचार करीत आहे. आतापर्यंत या आजाराबद्दल नेमकी माहिती स्पष्ट झाली नसून हा आजार डेंग्यू आजार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डेंग्यू जीवघेणा आजार असल्यामुळे सर्वत्र एकच दहशत पसरली आहे.

भाडीपार हे गाव वाघनदीच्या काठावर आहे. तालुक्यात चार दिवसापूर्वीच अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीचा फटका भाडीपार गावाला सुद्धा बसला. गावात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.