जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी एनडीआरएफ प्रदर्शनी व कार्यशाळा

0
16

berartimes.com
गोंदिया,दि.२६ : कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता, या आपत्तीतून होणारी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी लोकसहभागातून आपत्तीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
२६ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरण पुणे येथील पाचव्या बटालीयनचे मेजर दुली चंद, मेजर ददन तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्त्ती व्यवस्थापनाच्या बटालीयनने पाच दिवसाच्या वास्तव्याच्या काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त जणांना आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दयावे. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे ज्ञान डॉक्टर पासून तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असले पाहिजे. पूरपरिस्थितीच्या काळात योग्य समन्वय राहावा यासाठी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवनी, तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचीही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील ८५ गावे पुराने बाधित होतात. या गावातील नागरिकांनी पूरपरिस्थितीच्या काळात पूरस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात. मानवनिर्मीत होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नेहमी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रास्ताविकातून श्री.महिरे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची चमू पाच दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात आग प्रतिबंधक, पूरपरिस्थिती नियंत्रण याबाबतची रंगीत तालीम देणार आहे. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी स्थानिक स्तरावर तयारी करावी असेही सांगितले. या प्रशिक्षणाची जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेवून आपत्तीच्या काळात या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. दुली चंद यांनी आपत्तीबाबत प्रत्येकाने जागृत असणे गरजेचे असल्याचे सांगून कोणत्याही प्रसंगी सजग राहण्याची आवश्यकताही त्यांनी विशद केली.
यावेळी एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार, बचाव कार्य, आपत्तीच्यावेळी घेण्यात येणारी दक्षता, घरात उपलब्ध असलेल्या संसाधनाचा आपत्त्तीच्या काळात कसा उपयोग करावा याबाबतची माहिती देण्यात आली.
बचाव व मदत कार्यात उपयोगात येणारी साहित्य व साधने, स्वयंचलीत डोंगे, कटर, कामात येणारे अवजारे, बोल्ड कटर, कम अलाँग, सरप्राईडर कटर, रेस्प्रो कटींग सॉ, एअर लिफ्टींग बॅक, चिपींग हॅमर, ड्रील मशीन तसेच पूरपरिस्थितीच्या काळात उपयोगात येणारे साहित्य, आऊट बोर्ड मोटर, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, लाईफ लाईन, प्रथमोपचार पेटीतील साहित्य याबाबतचे प्रदर्शन एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने लावण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना बटालीयनच्या सैनिकांनी माहिती दिली.
एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनचे सैनिक एम.विजयन, डि.एम.मितकीरी, राजेंद्र जाट, माहीर जालंदर, राजीवकुमार, राकेशकुमार पाठक, एस.एस.पांडे, के.एस.जौनध्याल, आर.सिल्व्हाकुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासह माहिती दिली.
कार्यशाळेला प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे, प्रा.डॉ.कविता राजाभोज, सहायक अधीक्षक श्री.किरीमकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रविणकुमार, व्ही.सी.कोल्हटकर, संजय सांगोडे, विविध महाविद्यालयाचे समन्वयक, मनोहर म्युन्सीपल विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, महावीर मारवाडी विद्यालय, जे.एम.हायस्कूल, एन.एम.डी.कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, व्हाईट आर्मीचे युवक, गृहरक्षक दल, पोलीस दलचे जवान यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.