शिवसेना काढणार पवनी-भंडारा पदयात्रा

0
9

berartimes.com भंडारा,दि.27 : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी २८ सप्टेंबरला पवनी ते भंडारा संघर्ष पदयात्रा काढण्यात येत असल्याचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

संघर्ष पदयात्रा बुधवारला सकाळी ९ वाजता पवनी येथील गांधी चौकातून निघणार आहे. कोंढा, अड्याळ येथे सभा घेऊन पहेला येथे मुक्काम करणार असून गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहोचणार आहे. या यात्रेची माहिती देताना नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले म्हणाले, महिला रूग्णालयाच्या जागेशेजारी बांधण्यात आलेले ठोक भाजी बाजार हटवून ती संपूर्ण जागा महिला व बाल रूग्णालयासाठी देण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर द्या, बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिल रोजी स्थानिक सुटी देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, रोवणी ते मळणीपर्यंतची शेतकामे रोहयोतून करण्यात यावी, मागेल त्याला कृषीपंप जोडणी देऊन २४ तास वीज पुरवठा करावा या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख अनिल गायधने, संजय रेहपाडे, मुकेश थोटे उपस्थित होते.