महाराष्ट्राला देशातील पहिले दुष्काळमुक्त राज्य करणार- देवेंद्र फडणवीस

0
9

नागपूर, दि. 2 : आजच्या दिवशी याच वेळी बरोबर दोन वर्षापूर्वी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहचविण्याचा प्रयत्न असून दोन वर्षात 4 हजार 600 गावे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून दुष्काळमुक्त केली आहे. पुढील तीन वर्षात 20 हजार गावे दुष्काळमुक्त करुन महाराष्ट्र हे देशातील पहिले दुष्काळमुक्त राज्य होणार] असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते तेली समाज मेळावा व परिचित पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा  खोपडे, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश गिरडे, शंकरराव भुते, गुलाबराव जुनुनकर व बबिता मेहर यावेळी उपस्थित होते. तेली समाज संघटनेच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेसाठी 2 लाख 11 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री यांना सुपूर्द करण्यात आला.
राज्यातील 25 हजार शाळा डिजिटल केल्या असून 17 हजार शाळा लवकरच डिजिटल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 4 हजार 600 गावे दुष्काळमुक्त केली असून ग्रामीण भागातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. येत्या काळात 20 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
तेली समाजाचे कार्य प्रेरणादायी असून या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जवाहर वस्तीगृहाचा चेंज ऑफ युजर निश्चितपणे करुन देण्यात येईल अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. वारकरी भवन उभारण्यासाठी तात्काळ मान्यता देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तेली समाजाच्यावतीने वधू-वर परिचय असलेल्या सुयोग पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. सुयोगच्या माध्यमातून भावी जिवनाची सुरुवात युवक-युवती करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथे उपस्थित तरुण-तरुणींना त्यांच्या मनातील जोडीदार मिळावा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गिरड यांनी केले. जलयुक्त शिवार या योजनेच्या त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाची योजना असा गौरव आपल्या भाषणात केला. या कार्यक्रमास तेली समाज बांधव व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.