उद्यापासून भागवत कथायज्ञ : साध्वी ऋतंभरादेवींचे सप्ताहभर बोधामृत

0
20

गोंदिया,दि.2 : पुर्व विदर्भात व्यापारनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया शहरात उद्या दि.३ पासून एक आठवडाभर प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतंभरादेवी यांच्या कथा-ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे सासरे घनश्याम मसानी यांच्या पुढाकाराने आयोजित या भागवत कथायज्ञामुळे व्यापारनगरी भक्तीमय होणार आहे.गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन यार्डसमोरील घाट रोडवर बनविलेल्या ‘वृंदावनधाम’मध्ये हा भागवत कथायज्ञ होणार आहे.
कथास्थळी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती देताना संजयसिंग मसानी, विश्‍व हिंदू परिषदेचे राजू वालिया आणि मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले की, हे आयोजन मसानी परिवारातर्फे असले तरी ते केवळ निमित्तमात्र आहेत. वास्तविक हे आयोजन संपूर्ण गोंदियावासीयांचे आहे. शहरवासियांच्या सुख, शांती, समृद्धीसाठी सदर भागवत कथा आयोजित केली आहे. देशातील विविध समाजात दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी, कुटुंबातील आंतरिक क्लेष, तणाव कमी करून आपल्या संस्कृतीची ओळख समाजाला व्हावी यासाठी हे आयोजन केले जात आहे. भरकटत चाललेल्या नवीन पिढीला योग्य मार्ग दाखविण्याचे काम या कथायज्ञातून केले जाणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व लोकांकडून यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे साध्वी ऋतंभरादेवी यांचे सप्ताहभराचे भागवत विदर्भात पहिल्यांदाच होत असल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात सदर भागवत चालणार आहे.
यासाठी ९0 बाय ३५0 फुटांचा मुख्य मंडप (डोंब) राहणार आहे. त्यात १२ हजार लोक एकाचवेळी बसू शकतील. तसेच दोन्ही बाजुंनी ४५ बाय ३५0 फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. त्यात भाविकांनी कथाकार ऋतंभरादेवींना जवळून पाहता यावे यासाठी एलईडी टीव्हीसुद्धा लावले जाणार आहेत.कथामंडपाचे वैशिष्ट्य विशेष म्हणजे मंडपच्या आतील दोन्ही बाजुने देशातील विविध राष्ट्रपुरूष, संत-महात्मे आणि देवीदेवतांचे फोटो लावण्यात आले आहेत. राष्ट्रपुरूषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापासून तर डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो लावलेले आहेत.जिल्हाभरातील आणि बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांना कथास्थळी पोहोचविण्यासाठी शहरात काही विशिष्ट ठिकाणी वाहनांचीही व्यवस्था केली जाणार आहे.