जेएसव्हीच्या इतर संचालकांना अटक करा

0
9

भंडारा दि.७ : जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया कंपनीच्या संचालिका संध्या ईश्‍वर आंबाडारे व इतर संचालकांना २४ तासाच्या आत अटक करा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा मधुकर येरपुडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लि. कंपनीच्या संचालकांनी दामदुप्पट करून देण्याचे प्रलोभन देऊन हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या कंपनीचे संचालक अमीत चौधरी, राजेंद्र भाले, विजयालक्ष्मी कटेत, संध्या ईश्‍वर आंबाडारे व इतर ९ व्यक्तीविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याचा तपास एल.सी.बी. कार्यालय भंडारा यांचेकडून सुरु आहे.त्यात संचालक अमीत चौधरी, राजेंद्र भाले यांना अटक करण्यात आली होती.
मात्र संचालिका संध्या ईश्‍वर आंबाडारे यांनी भंडारा न्यायालयातून तात्पुरती जमानत मंजूर करवून घेतली होती. ती जमानत ४ नोव्हेंबर रोजी भंडारा न्यायालयाने रद्द केली आहे. त्याची माहिती एलसीबी कार्यालयाला गुंतवणूकदारांनी दिली असून संध्या आंबाडारे यांना तात्काळ अटक करा अशी विनंती केली. त्यावेळी एलसीबी कार्यालयाकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आले. त्यामुळे आज ५0 गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. संध्या आंबाडारे व इतर संचालकांना २४ तासाच्या आत अटक करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने ७ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात नमूद आहे.
यावेळी विष्णूदास लोणारे, मधुकर येरपुडे, धनराज भेलावे, नामदेव तिजारे, संजय लांजेवार, ज्ञानेश्‍वर निकुळे, राजकुमार बावनकर, फुलवंता कोकुडे, केशवराव बिसने, कन्हैया नागपुरे, विद्या भांबोरे, सीमा वाडीभस्मे, गणेश शहारे, श्यामलाल काळे, रमेश बोंदरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.