वेगळ्या विदर्भाच्या गजरात दिंडी निघाली नागपूरला

0
9

देवरी- ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे‘, ‘विदर्भ आमच्या हक्काचा…‘, असा गगनभेदी गजर करत छत्तीसगडच्या सीमेवरून काल दुपारी वेगळ्या विदर्भाच्या दिंडीला हिरवी झेंडी दाखवून नागपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले.
स्थानिक जिल्हा परिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात विदर्भ राज्य समितीचे मुख्य निमंत्रक प्रा. राम नेवले,जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. टी बी कटरे, माजी आमदार आनंदराव वंजारी, अ‍ॅड. नंदा पराते, माजी आमदार रामरतन राऊत, आदिवासी नेते भरसतसिंह दुधनांग, डॉ. श्यामकांत नेवारे, अ‍ॅड. प्रशांत संगिडवार, अर्चना नरवरे, देवरीच्या नगराध्यक्ष सुमन बिसेन,अ‍ॅड. भूषण मस्करे, अ‍ॅड. सचिन बावरिया, अ‍ॅड. पुष्पकुमार गंगभोईर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी वेगळ्या विदर्भाची गरज का? या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. विदर्भाची मागणी ही १०९ वर्षे जुनी असून सर्व राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. केवळ राजकीय लाभासाठी सत्ताधारी पक्षाने वेगळ्या विदर्भाचा गाजर दाखवत राज्याची सत्ता बळकावली. मात्र,सत्तेत येताच त्यांनी या मागणीला ठेंगा दाखविला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आपापली मते मांडली.
देवरी येथून वेगळ्या विदर्भाच्या दिंडीला प्रा. नेवलेंसह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून नागपूरच्या दिशेने रवाना केले. ही दिंडी देवरी, आमगाव, गोरेगाव, गोंदिया, तिरोडा, तुमसर मार्गे ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या यशवंत स्टेडिअम येथे पोचणार असून तिथून विधानभवनावर विराट मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, विधानभवनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याविशेष म्हणजे छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून निघालेल्या या दिंडीला आदिवासी नृत्य आणि ढोलताशांच्या गजरात रवाना करण्यात आले. वेळी तालुक्यातील विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.