आलापल्लीत ४ लाख ९७ हजारांची रोकड जप्त

0
5

आलापल्ली,दि.१: केंद्र शासनाने पाचशे व एक हजारच्या नोटा बंद केल्यानंतर आज दुपारी अहेरी पोलिसांनी ४ लाख ९७ हजारांची रोकड घेऊन प्रवास करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
काळ्या पैशावर अंकूश लावण्यासाठी शासनाने पाचशे व एक हजारच्या नोटा बंद करुन नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जुन्या साठविलेल्या पाचशे व एक हजारच्या नोटांची मोठी रोकड बँकेत जमा करण्याचे काम काही इसम करीत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे
आज पोलिसांनी आलापल्ली येथील भंबारा चौकात नाकेबंदी करुन ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरु केली होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच ३३ ए- ५७०५ क्रमांकाचे महिंद्रा बोलेरो हे वाहन सिरोंचाकडून आलापल्लीच्या दिशेने येत होते. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता वाहनात बसलेले सुनील यल्लावार व रमेश गोलकोंडा दोघेही रा.अंकिसा ता.सिरोंचा यांच्याकडे ४ लाख ९७ हजार रुपये आढळून आले. त्यात जुन्या १ हजारच्या १५० नोटा व पाचशेच्या ६३४ नोटा आढळून आल्या. या रकमेबाबत पोलिसांनी दोघांनाही विचारणा केली. सिरोंचा येथे रेतीची अवैधरित्या वाहतूक केल्यामुळे महसुल विभागाने आपल्यावर दंड ठोठावला. ही दंडाची रक्कम भरण्यासाठी आपण गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जात असल्याचे सुनील यल्लावार व रमेश गोलकोंडा यांनी पोलिसांना सांगितले. मात्र एक हजाराची नोट बंद झाल्याने पोलिसांना शंका आली. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेऊन रोकड जप्त केली. याबाबत आयकर विभागाला माहिती देऊन चौकशी करण्यात येईल, अशी माहिती अहेरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
रोकड जप्त करण्याची कारवाई पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कोळेकर, लक्ष्मण मोहुर्ले, संजय बोल्लेवार, नागेश कैलावार, जुगी हेडो यांनी ही कारवाई केली.