निवडणूक आयोगाने रद्द केली देसाईगंजमधील प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ ची निवडणूक

0
6

देसाईगंज, ता.१०: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका उमेदवारासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने देसाईगंजमधील प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ ची निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
५ डिसेंबर रोजी मंत्री महादेव जानकर देसाईगंज येथे गेले होते. त्यांनी प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधील काँग्रेसचे उमेदवार श्री.मोटवानी यांचे पक्षातर्फे सादर केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेऊ द्यावे व त्यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणला. ही बातमी एका वृत्तवाहिनीत प्रसारित झाल्यानंतर महादेव जानकर चांगलेच अडचणीत आले. प्रदेश काँग्रेसनेही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने महादेव जानकर यांना खुलासा मागितला व गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही आयोगाकडे यासंदर्भातील अहवाल सादर केला. यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश जारी करुन प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ ची निवडणूक रद्द करीत असल्याचे सांगितले आहे. या प्रभागात नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. मात्र नगरसेवकाच्या जागेसाठी आयोगाच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.