भविष्यात बचतगटांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देणार- पालकमंत्री बडोले

0
19

१९ बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप

गोंदिया,दि. १० : समाज कल्याण विभागाच्या योजना हया केवळ स्कॉलरशिप व वसतीगृहापर्यंतच मर्यादित नसून त्या सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांना सक्षम करण्यासाठी मिनी ट्रॅक्टरची योजना ही समाज कल्याण विभागाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतून बचतगटात क्रांती झाली पाहिजे यासाठी भविष्यात बचतगटांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१० डिसेंबर रोजी सडक/अर्जुनी तहसिल कार्यालय परिसरात समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हयातील १९ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार विठ्ठल परळीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री मोरे, महिन्द्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीचे पियुष मोकाशी यांची उपस्थिती होती.
श्री बडोले म्हणाले, राज्यात मागील वर्षी २ हजार मिनी ट्रॅक्टर बचतगटांना वाटप केले. त्या तुलनेत जिल्हयातून बचतगटांनी या योजनेला कमी प्रतिसाद दिला. जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. तो वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. बचतगटांनी ट्रॅक्टरचा वापर जास्तीत जास्त शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी कसे करतील यासाठी प्रयत्न करावे. अनुसूचित जातींच्या घटकातील शेतकऱ्यांसाठी भविष्यात विहिर व कृषी पंपाची योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांना घरे देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, रमाई आवास योजनेची व्याप्ती वाढूवन यामधून १ लाख ६० हजार घरे सन २०१९ पर्यंत बांधण्यात येतील. बचतगट हे सबसिडीपुरते मर्यादित न राहता त्यांनी मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभातून प्रभावीपणे काम करावे असेही त्यांनी सांगितले.
तहसिलदार परळीकर म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. मिनी ट्रॅक्टर योजनेतून बचतगटातील कुटूंबांना आधार मिळणार असून त्यांना आर्थिक फायदाही होणार असल्याचे सांगितले.
श्री मोरे म्हणाले, गोंदिया जिल्हा धान उत्पादकांनाचा जिल्हा आहे. बचतगटांना मिळालेल्या मिनी ट्रॅक्टरसोबत रोटावेटर हे उपसाधन दिले आहे. त्याचा उपयोग धान शेतीसाठी चांगल्या प्रकारे करता येईल. ट्रॉलीचा उपयोग सुध्दा शेती सोबत माल वाहतूकीसाठी करुन आपली आर्थिक स्थिती भक्कम करावी असेही त्यांनी सांगितले.यावेळी गोरेगाव तालुक्यातील करुणा महिला बचतगट गणखैरा, रमाई महिला बचतगट गिधाडी , पंचशील महिला बचतगट कवलेवाडा, करुणा महिला बचतगट तुमसर, प्रेरणा महिला बचतगट तेढा, श्री साई पुरुष बचतगट गणखैरा, आरोही महिला बचतगट निंबा, सहयोग महिला बचतगट बोटे, रमाई महिला बचतगट गोरेगाव, आमगाव तालुक्यातील समता महिला बचतगट कुंभारटोली, फुले शाहू स्वयंसहाय्यता बचतगट कुंभारटोली, सालेकसा तालुक्यातील सिध्दार्थ महिला बचतगट कडोतीटोला, सुजाता महिला बचतगट मक्काटोला, विधाता महिला बचतगट साखरीटोला, दिक्षा महिला बचतग्ट कडोतीटोला, कृषी तथागत महिला बचतगट कहाली, तिरोडा तालुक्यातील रमाबाई महिला बचत गट कोडेलोहारा, पंचशील महिला बचत गट सीतेपार, समता महिला बचतगट करटी अशा एकूण १९ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांना मीनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हयातील बचतगटांच्या महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार प्रदिप ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण निरीक्षक अंकेश केदार, मुख्याध्यापिका संध्या दहिवले, श्री अंबुले यांचेसह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.