26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ ओबीसींनी झुगारली वैचारिक गुलामगिरी

ओबीसींनी झुगारली वैचारिक गुलामगिरी

0
30

नागपूर दि.26: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या समाजाला मुक्त केले. त्यानंतर घडलेले ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिवर्तन जगाने अनुभवले. आज तब्बल ६० वर्षानंतर त्याच दीक्षाभूमीवर हजारो ओबीसी बांधवांनी जाहीरपणे वैचारिक गुलामगिरी झुगारत बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन पुन्हा एका नव्या परिवर्तनाला वाट मोकळी करून दिली. ते सुद्धा मनुस्मृती दहनाच्या दिवशी, हे विशेष.
यावेळी विशेषत्वाने आंबेडकरी विचारवंत व दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले, पीरिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. भाऊ लोखंडे, रूपाताई कुलकर्णी, जेमिनी कडू, बीआरएसपीचे किशोर गजभिये, बार्टीचे राजेश ढाबरे, बसपाचे उत्तम शेवडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्यासह त्रिरत्न बौद्ध महासंघ, शहरातील विविध बुद्ध विहार, आणि आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खूंनीही धर्मांतरित ओबीसी बांधवांचे स्वागत केले.
ओबीसी समाजाचे नेते दिवंगत हनुमंतराव उपरे यांनी १४ आॅक्टोबर २०११ रोजी ओबीसींच्या उन्नतीसाठी धर्मांतराशिवाय पर्याय नाही, अशी भूमिक मांडून पाच वर्षानंतर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ६० व्या वर्षी मोठ्या संख्येने धर्मांतर करून बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या दिवसापासून त्यांनी इतर मागासवर्गीयांमधील विविध जातींमध्ये धर्मांतरासाठी जनजागृती घडवून आणण्याकरिता ‘चलो बुद्ध की ओर’ असे अभियान सुरू केले. परंतु गेल्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही चळवळ थोडी थंडावली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी या अभियानाला गती दिली, आणि उपरे काका यांचा संकल्प पूर्ण केला.

रविवारी दुपारी दीक्षाभूमीवर हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव दीक्षेसाठी एकत्र आले. तत्पूर्वी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे, हनुमंतराव उपरे यांच्या पत्नी कमलताई, मुलगा संतोषसह उपरे कुटुंबीय ओबीसी बांधवांसह संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीने दीक्षाभूमीवर पोहोचले.

यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव प्रमुख अतिथी होते. दुपारी ३ वाजता धम्मदीक्षेला सुरुवात झाली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा दिल्या.

आंबेडकरी समाजाची प्रगती ही धम्मामुळेच

आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. माझे वडील ज्यांना सर्वच उपरे काका म्हणायचे, त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. त्यामुळेच जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा मला माझ्या भावना आवरता आल्या नाही. वडिलांच्या आठवणीने अश्रू निघाले. माझे वडील नेहमी म्हणायचे, आम्ही हिंदू म्हणून इतके वर्ष जगत आहोत. परंतु मंडल आयोग असो की इतर सुविधा, जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाला काही सवलत मिळण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा सवर्ण हिंदू रस्त्यावर येतात. त्यामुळे ओबीसी समाजाच्या विकासात सवर्ण हिंदू हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ओबीसी समाज मूळ नागवंशी म्हणजे बौद्धच होते. त्यामुळे आम्ही आज आमच्या मूळ धम्मात परत आलो आहोत. आंबेडकरी समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे नव्हे तर धम्मामुळे झाली आहे.

blank